
नाशिक येथे चालू असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सन्माननीय कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ‘जिंदगानी’ या सामाजिक विषयावर आधारित आगामी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ‘जिंदगानी’ या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन विनायक साळवे यांनी केले असून, निर्मिती सुनीता शिंदे यांनी नर्मदा सिनेव्हिजन्स या निर्मिती संस्थे मार्फत केली आहे. चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवले असून, आपल्या मातीतील प्रेक्षकांनाही तो आवडेल असा विश्वास निर्मात्यानी व्यक्त केलाय.

पोस्टर अनावरण सोहळ्यात छगन भुजबळ म्हणाले की, “नाशिकचे स्थानिक कलाकार आणि येथीलच तंत्रज्ञ यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती झाली असून त्याचा गौरव करण्यासाठी हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन सगळ्यांनी नक्की बघायला हवा”.
चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रयोगशील नट म्हणून ओळखले जाणारे शशांक शेंडे तर नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे हे कलाकार आहेत. त्यांच्या जोडीला सविता हांडे, सुष्मा सिनलकर, स्मिता प्रभू, सायली पाटील, अभिनेते विनायक साळवे, प्रदिप नवले, गणेश सोनवणे, प्रथमेश जाधव, रवि साळवे, सागर कोरडे, संजय बोरकर, दिपक तावरे, पांडुरंग भारती हे कलाकार आपल्याला दिसणार आहेत. विजय गवंडे यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. तर चित्रपटातील गाणी अजय गोगावले, आदर्श शिंदे, बेला शेंडे, राधिका अत्रे, अमिता घुगरी यांच्या सुरमधुर स्वरांनी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.
येत्या ११ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
The post छगन भुजबळ यांच्या हस्ते ‘जिंदगानी’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण appeared first on .